हूश्श...अखेर सिटी बस आली, २३ पासून शहरवासियांच्या सेवेत

Foto

औरंगाबाद- औरंगाबाद महापालिकेचा ८ डिसेंबरला वर्धापन दिन आहे. त्याआधी सिटी बस सुरु होईल असे आश्वासन महापौरांना दिले होते. महापालिकेचे अधिकारी वेळेवर तपासणीसाठी न गेल्याने टाटाने या बस देण्यास नकार दिला होता. त्यामुळे सिटी बस सेवा सुरु होणार की नाही, याबाबत शासंकता निर्माण झाली होती. मात्र आता मोठ्या प्रतिक्षेनंतर शहरात २३ डिसेंबरपासून ‘सिटी बस’ सेवा सुरु होणार आहे. शुक्रवारी (दि.७) सिटी बसची शास्त्रीय पद्धतीने पूजा करण्यात आली. यावेळी स्मार्ट सिटीचे मेंटॉर तथा अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, महापौर नंदकुमार घोडेले, मनपा आयुक्त निपुण विनायक, सभागृह नेता विकास जैन, स्थायी समिती सभापती राजू वैद्य आदींची उपस्थित होते.

स्मार्ट सिटीअंतर्गत केंद्र शासनाने आतापर्यंत महानगरपालिकेला २८३ कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे. यातून सिटी बस सेवा सुरू करण्यासह इतरही विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. १०० बस खरेदीचे काम टाटा कंपनीला देण्यात आले असून, यातील ३० बस डिसेंबर महिन्यातच मिळणार आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून सिटी बस सुरु करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी होती. अखेर २३ डिसेंबरचा मुहूर्त साधून सिटी बस सेवा सुरु होणार आहे. शहरात सुरु होणाऱ्या सिटी बस मध्ये हायड्रोलिक दरवाजे, चारही बाजूंना सीसीटीव्ही कॅमेरे अशा सुविधा असणार आहेत.